पुणे :- ( दैनिक शिवसंग्राम न्यूज पोर्टल )
उत्तर प्रदेशात सध्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार सुरु असून विविध राजकीय पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढायला सुरुवात केली आहे. त्यातच राज्यातील राजकीय घडामोडींवर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केलं आहे.नवाब मलिक यांच्यावरुन ओवैसींनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील एका प्रचार सभेत बोलताना ओवैसी म्हणाले, एका घोटाळ्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे आझम खान खान तुरुंगात आहेत पण तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव का बाहेर आहेत? सापावाल्यांनो तुम्हाला माझं बोलणं कडवट वाटेल. आता अजून एक गोष्ट ऐका, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक तुरुंगात आहेत.
पण राष्ट्रवादी काँग्रेसचेच उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र सिंचन घोटाळ्याचा आरोप असतानाही बाहेर का आहेत? हे काय सुरु आहे? “तुम्हाला या गोष्टी कळत नाहीत का? कोणी खरोखरच तुमचा नेता असेल तर तो तुमच्यासाठी लढेल, कोणी आकाशातून किंवा जमिनीतून बाहेर येणार नाही,” अशा शब्दांत ओवैसींनी मुस्लीम मतदारांना चुचकारण्याचाही यावेळी प्रयत्न केला.