पुणे :- ( दैनिक शिवसंग्राम न्यूज पोर्टल )
केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर दिशा सालियन बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सालियन कुटुंबीयांच्या तक्रारीवरून राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहिलेल्या दिशा सालियनचा मृत्यू होऊन आता जवळपास दोन वर्ष उलटली असून नारायण राणे यांनी मागील आठवड्यात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाच्या मृत्यूसंदर्भात गंभीर दावे केले होते. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’उद्धव ठाकरे यांचे पुन्हा ‘सूड दुर्गे सूड’…दिशा सालीयन प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात FIR. खुनशी ठाकरे सरकारचा निषेध’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली तसेच ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेत आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहन केलं होतं. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती.