पुणे :- ( दैनिक शिवसंग्राम न्यूज पोर्टल )
देशातील पाच राज्यात सध्या निवडणुका सुरु आहेत. टप्प्यांमध्ये चालु असणाऱ्या या विधानसभा निवडणुकींसाठी त्या त्या राज्यांत रीघ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मार्फत देशवासीयांशी संवाद साधला आहे. यावेळी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर बोलताना त्यांनी भारतीय भाषांना लोकप्रिय करण्याचं आवाहन केलं आहे. आता त्यांच्या या विधानामुळं विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, सध्या देशात पहायला गेलं तर कृतीची आवश्यकता आहे, मात्र या सगळ्याकडे कानाडोळा करत देशाचे पंतप्रधान मात्र सर्वांचे लक्ष विचलीत करण्यावर भर देत आहेत. आपल्या देशाला ठोस योजनांची गरज आहे पण पंतप्रधान केवळ गाजर दाखवतात.
पंतप्रधान मोदी यांनी काल झालेल्या मन की बात या कार्यक्रमात केलेल्या आवाहनाला अनुसरुन त्यांनी हा टोला लगावला आहे.नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये टांझानियाचे किली पॉल आणि नीमा पॉल या भावंडांचं उदाहरण देत, या भावंडांप्रमाणेच मी प्रत्येकाला, विशेषत: वेगवेगळ्या राज्यांतील मुलांना लोकप्रिय गाण्यांचे लिप-सिंकिंग व्हिडिओ बनवण्याचे आवाहन करतो, असं म्हटलं आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेतून भारतीय भाषांना लोकप्रिय करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.