पुणे :- ( दैनिक शिवसंग्राम न्यूज पोर्टल )
भारताचा माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफी सामन्यात शतक झळकावले. सौराष्ट्र विरूद्धच्या सामन्यात अजिंक्यने पहिल्याच दिवशी शतक झळकावून आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. मुंबईने सौराष्ट्र विरूद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रापर्यंत 3 बाद 219 धावांपर्यंत मजल मारली आहे. यात अजिंक्य रहाणेच्या नाबाद 100 तर सर्फराज खानच्या नाबाद 85 धावांचा मोलाचा वाटा आहे.
भारतीय कसोटी संघातून वगळले जाण्याची टांगती तलवार असलेल्या अजिंक्य रहाणेने मुंबई विरुद्ध सौराष्ट्र यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यात दमदार फलंदाजी केली. त्याने मुंबईचा 3 बाद 44 धावांवरून डाव सावरत संघाला 200 चा टप्पा पार करून दिला. तो सध्या शतक करून नाबाद आहे. तर त्याला साथ देणारा सर्फराज खान देखील शतकाच्या जवळ पोहचला आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 175 धावांची नाबाद भागीदारी रचली आहे. कामगिरीत सातत्य नाही म्हणून अनुभवी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना भारतीय कसोटी संघातून डच्चू मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या दोघांचीही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फारशी चांगली कामगिरी झाली नव्हती. त्यांना आपला फॉर्म सिद्ध करण्यासाठी रणजी ट्रॉफी ही एकमेव संधी होती.
श्रीलंकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी रणजी ट्रॉफीचा मुंबई आणि सौराष्ट्र हा सामना खेळवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि सौराष्ट्रकडून चेतेश्वर पुजाराला आपला फॉर्म सिद्ध करण्याची शेवटची संधी मिळाली होती. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईकडून अजिंक्यने शतक ठोकून या संधीचा फायदा उचलण्याचा चांगला प्रयत्न केला. आता चेतेश्वर पुजारा कशी फलंदाजी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.