पुणे :- ( दैनिक शिवसंग्राम न्यूज पोर्टल )
युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आण्विक कवायतींचा भाग म्हणून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी शनिवारी केली. वार्षिक सरावांमध्ये किंझल आणि त्सिर्कॉन हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि इतर अनेक शस्त्रांची चाचणी केल्याचे, निवेदनात क्रेमलिनने सांगितले आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या देखरेखीखाली केलेल्या धोरणात्मक आण्विक सरावांचा एक भाग म्हणून देशाने समुद्र आणि जमीन-आधारित लक्ष्यांवर मारा केला.
युक्रेनवर रशियाकडून हल्ला होण्याची पाश्चिमात्य देशांना वाटणारी शंका दूर झाली नसताना आणि तणावाचे ढग कायम असतानाही मोठा लष्करी सराव शनिवारी घेण्याचे रशियाने शुक्रवारी जाहीर केले होते. या सरावावेळी क्षेपणास्त्रांचीही चाचणी घेतली जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी रशियाकडून करण्यात आली.रशिया आणि बेलारूसचा सध्या संयुक्त लष्करी सराव सुरू आहे. या दोघांच्या सीमा युक्रेनला लागून आहेत. याच सीमेवर हा सराव झाला आहे. या सरावाच्या निमित्ताने रशियाने सीमेवर तैनात केलेल्या सैनिकांची संख्या दीड लाख झाली आहे. रशियाचे युक्रेनवर कोणत्याही क्षणी आक्रमण होऊ शकते, असा अमेरिकेचा दावा आहे.
निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरच रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मोठा लष्करी सराव घेण्याचे जाहीर केले होते. त्याअंतर्गत क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार वार्षिक सरावांमध्ये किंझल आणि त्सिर्कॉन हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि इतर अनेक शस्त्रे प्रक्षेपित करण्यात आली, असे निवेदनात क्रेमलिनने सांगितले.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या देखरेखीखाली केलेल्या धोरणात्मक आण्विक सरावांचा एक भाग म्हणून देशाने समुद्र आणि जमीन-आधारित लक्ष्यांवर मारा केला, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. रशियन लष्करी कमांड आणि सैन्याची तत्परता तसेच त्याच्या आण्विक आणि पारंपरिक शस्त्रास्त्रांची विश्वासार्हता तपासण्यासाठी या सरावाचे नियोजन काही वेळापूर्वीच करण्यात आले होते. काही दिवसांत रशिया युक्रेनवर हल्ला करू शकतो, असे संकेत आहे.
रशिया आणि अमेरिका यांच्यातील वाढलेल्या तणावादरम्यान वायडेन यांची टिप्पणी आली आहे. त्यामुळे मॉस्को युक्रेनवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची भीती निर्माण झाली आहे. रशियाने मात्र युक्रेनवर हल्ला करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले.